फार सुंदर, अप्रतिम, संततधार, मुसळधार, धोधो वगैरे पाऊस पडतोय.
रवीवारपासून शुक्रवार पर्यंत.
रस्त्यावर तळी साचली आहेत..
जस्ट पुण्यातून परतल्यामुळे मला होमसिक वाटू नये म्हणूनच की काय असा पाऊस पडतोय.

मी .. खिडकीपाशी बसून .. ते सर्व पाहतीय.. गेले ३ दिवस.. आणि पाहीन पुढील ३ दिवस..

पाऊस.. !

का मला वेड लागतं पाऊस पाहून काही कळत नाही!
माझ्या जीटॉकवर असणार्‍यांनी नक्कीच जानेवारीच्या सुमारास its raining! हे स्टेटस पाहीले असेल ! Big Smile
आता त्यात काय नाचायचे? पण होतो आनंद..

लहानपणी पाऊस पडला की आम्ही चौघं सगळे गाडीतून भटकायला निघायचो. घरून पापड्स, चिप्स वगैरे घेऊन मस्त गाणी ऐकत, पाषाण बिषाण या तेव्हाच्या लांब जागांना भटकून यायचो!
वाटेत भजी,समोसा, पिझ्झा बिझ्झाही खायचो ! बाबांना खरंतर पाऊस आवडत नाही. आई अन मी अत्यंत पाऊस वेड्या. दादाचे काय मत होते कोणास ठाऊक? पण त्याला भटकायला आवडत असेल कदाचित. बाबा मग, आम्हा सर्वांसाठी काढायचे गाडी. नाहीतर त्यांचा प्रेफरंस नक्कीच पांघरूण घेऊन झोपण्याला व नंतर उठून चहा भुरकण्याला असला असता..

पावसाळ्यात शाळेतून घरी येताना बर्‍याचदा धोधो पाऊस लागायचाच. त्यात मी, मानसी व विशाखा सायकलवरून निघायचो. माझा व मानसीचा रेनकोट अगदी स्सेम ! खरंतर कोणाएकीकडेच असता तर तो फार युनिक पीस झाला असता! पण असो. आम्हा दोघींकडे सारखाच “युनिक”(?) पीस होता!! (माझ्यामते) पीस्ता व (मानसीच्यामते) नीळा असलेला तो जाडसर व थोडा ट्रान्स्परंट रेनकोट अम्हाला फार आवडायचा! त्यामुळे साहजिकच पावसाची वाटच बघायचो आम्ही! आणि नंतर दोघींनी सेम रेनकोट घातलाय, किती मंद दिसत असू , म्हणून खिदळत जाणे तर नेहेमीचेच. पाऊस म्हटला की नळस्टॉपचा रस्ता, संध्याकाळची गर्दीची वेळ, तरीही गर्दीतसुद्धा जसं काही रस्त्यावर आम्हीच फक्त आहोत अशा आविर्भावात सायकल हाकणार्‍या आम्ही , मैत्रिणींनी(?????) माझे ओले कुरळे केस पाहून म्हटलेले “ओ हसीना जुल्फोवाली” गाणे?!?!,  ते वेड्यासारखे खिदळणे, पावसाळ्यातल्या सायकलीचे ब्रेक्स कामातून गेले असतानाच्या सायकल-रेसेस… huh.. काय काय नाही आठवत ? कसं पावसाला पाहून, हे आठवून वेड लागणं शक्य नाहीये?

७-८वीत असताना, एकदा असाच मुसळधार पाऊस आला होता. सावनी मला भिजायला बोलवायला आली होती. मी गेले. ती मी व दिप्ती. कॉलनीतून उन्हात फिरत असल्यासारख्या धोधो पावसात चालत गप्पा मारत फिरलो होतो. व नंतर सावनीच्या घरच्या गच्चीवर जाऊन पाय बुडतील एवढ्या पाण्यात मांडी घालून मी त्यांना मृत्युंजय कादंबरी व कर्णाची झालेली उपेक्षा यावर अनेक तास लेक्चर दिले होते.. !

११-१२वी मध्ये असताना, पहिल्या पावसाला, आख्खा क्लास, शिक्षकांसकट, ग्राउंडवर जमून पावसात भिजला होता ! पावसातच बास्केटबॉल अन काय काय गेम्स खेळलो होतो.. शिवाय अजुन मजा.. घर आणि कॉलेजमध्ये केवळ ४ बिल्डींग्सचे अंतर असल्याने मी नेहेमी आरामात भिजतच घरी यायचे. कॉलेजम्धल्या १-२ ओळखीच्या मुलांनी माझे घर माहीत नसल्याने चक्क तेवढ्याश्या अंतरावर लिफ्ट हवीय का विचारल्यावर मी केवळ खदाखदा हसून त्यांना समोरचे माझे घर, माझे आई बाबा सुद्धा दाखवल्याचे आठवतेय!! Big Smile

थोडं मोठं झाल्यावर, इंजिनिअरिंगचा पाऊस वेगळाच होता. मैत्रिणींबरोबर कुठेतरी हॉटेल मध्ये बसून चहा पीत गप्पा मारणे हेच मुख्य आमचे काम. पावसाच्या बॅकग्राऊंडवर गप्पा अगदी खुलतात! वर्तमानकाळात न जगायचा तो काळ ! कायम भविष्याची चिंता व स्वप्ने.. कदाचित स्वप्नेच जास्त..!
मी व  स्वीटी, माझ्या स्कुटीवरून रेनकोट न घालता चिंब भिजत जाणे हा दुसरा उद्द्योग ! नंतर मी परत तशी कधी भिजले की नाही, पडणार्‍या त्या पावसाच्या पाण्याला कधी इतकी मनापासून भेटले की नाही कोणास ठाऊक ! कॉलेजचे दिवस म्हणूनच सतत आठवतात.. इंस्टिंक्ट्सवर डिंपेंड होऊन सर्वात वेडगळासारख्या गोष्टी आपण तेव्हा करतो, ज्या नंतर आपण प्रॅक्टिकल वागण्यात मिस करत बसतो..

आणि आता हा.. कॅलिफोर्नियातला पाऊस. कधी मधी उगवणारा. दुष्काळी कॅलिफोर्नियाला दिलासा देणारा. वाळलेले गवत, झाडं लखलखीत पुसून हिरवी करणारा.. त्याचबरोबर आपली मनं देखील हिरवीगार करणारा.. पूर्वीसारखे भिजायचा प्रयत्न करायला गेलो तर अतिशय थंडगार पाणी येणार चेहेर्‍यावर..!

त्यामुळे बरेचदा घरातल्या खिडकीतूनच पाहायचा हा पाऊस..

पण म्हणून काय झाले?
पाऊस तो पाऊसच !
वेड लावणारच तो !!

Smile

Popularity: 38% [?]

Tags:

· · · ◊ ◊ ◊ · · ·
काल स्टारबक्सला भेट द्यावी म्हणून बाहेर पडलो.. कॉफी घेतली, बरोबर कॉफी बेरी केकही घेतला.. आणि बाहेर खुर्च्यांवर गार वार्‍यात गप्पा मारत बसलो.. कॅलिफॉर्नियामधला उन्हाळा फारच सुंदर! जरा दुपारी दोन एक तास वाईट उकडतं खरं.. पण एरवी सुसह्यच! रात्री तर सुखद!!
असंच इकडचं तिकडचं, दिवसभरातल्या गमतीजमती, ऑफीसमधली कामं तिथल्या गंमती, पुढचे व्हेकेशन प्लॅनिंग असं सर्वांगीण गप्पा झाल्यावर उठलो.. घरी जावसं वाटेचना.. निघालो लॉंग ड्राईव्हला.. Keep reading…

Popularity: 25% [?]

Tags:

· · · ◊ ◊ ◊ · · ·
कशुमा लेक नंतर आम्ही निघालो सोल्वॅंगला ! तसं अगदीच जवळ.. १४ माईल्स..
जाताना रस्त्यात सुंदर हिरवी-पोपटी कुरणं लागली.. आणि सोल्वॅंगच्या डॅनिश शब्दाचा अर्थ कळला! Sunny Fields ! Keep reading…

Popularity: 23% [?]

Tags:

· · · ◊ ◊ ◊ · · ·

’माझी भटकंती’ या विषयावर लिहायचे अशी जोर्रात दवंडी पिटवूनही बरेच दिवस काही लिहीणे झाले नाही.. कारण: प्रसिद्ध व तीच ती ठिकाणे टाळणे.. अमेरिकेवर इतक्या लोकांनी , इतकं लिहीलंय की पुढे कोणीच काही नाही लिहीले तरी चालेल खरं.. त्यामुळे पर्याय कमी जरी नसले तरी दुर्मिळ/कमी-प्रसिद्ध पर्याय शोधावे लागतात.. senyum

बर्‍याच दिवसांपासून खास मीना प्रभू स्टाईल फिरण्यासाठी ( म्हणजे लिखाणासाठी फिरणे.. Smile ) जागाही शोधून ठेवली.. मात्र जाणं होईना! एकदाचे काल ठरले.. सोल्वॅंग .. ( Solvang – Danish word meaning ‘ sunny field’ ) Keep reading…

Popularity: 25% [?]

Tags:

· · · ◊ ◊ ◊ · · ·

आज लाँग ड्राईव्हला बाहेर पडलो, आणि काहीतरी वेगळं जाणवलं.. वारा,पावसाळी हवा,ढगाळ हवा, उकाडा आहेच असं विचित्र काँबो..थोडं गावाबाहेर पडलो तर असा सीन दिसला!
sun1

sun2

Keep reading…

Popularity: 20% [?]

Tags:

· · · ◊ ◊ ◊ · · ·
आज खूप दिवसांनी निवांत वेळ मिळाला.. म्हटलं आज काहीतरी छान , वेळ काढून, नीट लिहावे.. आता ते छान झालं की नाही माहीत नाही..! पण मन लावून लिहीतीय.. नेहेमी लिहीताना इतका विचार, इतकी तयारी मी एरवी नक्कीच करत नाही!

तर मी आज सुरवात करतीय “माझी भटकंती” लिहायला.. जसं जमेल तसे इथे पाहीलेल्या गोष्टी, ठीकाणं इत्यादींवर लिहायचे ठरवत आहे.. ते प्रवास वर्णन असेल की अजुन काय ते माहीत नाही.. खरं म्हणजे हे जास्त करून माझ्या आठवणींचा शोध, स्मरण आणि त्या त्या ठीकाणाबाबत मला जी काही माहीती मिळेल ती मी संकलित करून ठेवत आहे.. (काही माहीती ही विकीच्या माहीतीवरून भाषांतरीत केलेलीही असेल..) वाचकांना कितपत आवडेल कल्पना नाही पण माझा स्वतःचा आनंद नक्कीच असेल त्यात…

मी इथे लॉस एंजिलीस मधे राहते. म्हणजे अर्थातच माझ्या भ्रमंती मधे डिस्नेलॅंड आलं, युनिव्हर्सल स्टुडीओज आलं, सॅन दिएगो मधलं सीवर्ल्ड आलं.. अजुन हजार ठीकाणं.. पण मी सुरवात तरी करतीय त्यामानाने माहीत नसलेल्या ठीकाणापासून. तिथे मी रिसेंटलीच जाऊन आले त्यामुळे थोड्या आठवणी ताज्या! आणि कितीही छान असल्या तरी त्याच त्याच फेमस जागांबद्दल मला आत्तातरी नाही लिहायचेय.. ते परत कधीतरी!

ओके तर ही जागा म्हणजे ओहाय.. ( Ojai -> Valley of Moon ) . हे गाव पुर्वी म्हणजे साधारण १८७४ नॉर्डहॉफ नावाने स्थापन झाले.. परंतू पहील्या महायुद्धाच्या सुमारास जर्मन वाटणारी नावं बदलायचा ट्रेंड आला, त्यात या ही गावाचे नाव चेंज झाले.. व ते ओहाय म्हणून प्रसिद्ध झाले..

1

या व्हॅलीचा शोध माझ्या नवर्‍याला असंच फिरताना लागला.. संध्याकाळी लॉंग ड्राईव्हला बाहेर पडला तो सांता बार्बराच्याही पुढे गेला.. आणि काय रस्ता आहे पाहू म्हणत डोंगरदर्‍यांतून , जंगलातून, या सुंदर व्हॅलीतून जात राहीला.. आणि हे रत्न सापडले.. मी आल्यावर आम्ही मागच्या वर्षी खूप वेळा जाऊन आलो.. दर वेळेला तिथली फ्रेश हवा वेड लावते..

खरं म्हणजे मला काय लिहावं कळत नाहीये आता.. काही गोष्टी किती शब्दातीत असतात? मला नेहेमी तिथे जाताना असं वाटतं काय सुंदर निसर्ग आहे हा.. यावर भरभरून लिहीले पाहीजे.. प्रत्यक्ष लिहायला बसले तर काही सुचेना झालेय राव.. काही फोटोज टाकते अधुन मधुन.. म्हणजे तुम्हीही निशब्द व्हाल! Smile

3

पुर्णपणे घाटातली वाट.. वळणा वळणाची! दोन्ही बाजुंना पानांच्या ओझ्याने वाकलेली आणि कोण येतंय बरं घाटातून अशा उत्सुकतेने बघणारी झाडं.. अगदी कोणीतरी येऊन लावली आहेत सिस्टीमॅटीकली असं वाटतं.. अर्थात इतकी झाडं त्यामुळे भरपूर फ्रेश आणि गारेगार हवा.. गाडीतल्या एसीच्या तोंडात मारेल अशी! तो ऑक्सिजन छातीत भरून ठेवायची आम्हा दोघांना खोडच लागलीय..

4

भरपुर मनासारखे घाटात हिंडून , वर खाली चढ उतार करून झाले की चाहुल लागते पाण्याची!
अशा सुंदर ठीकाणी त्याहुन अत्युत्तम तलाव/लेक पाहीजेच! तिथे गाडी लावून त्या शांत पाण्यावर कधी उठल्याच तर लहरी आणि वार्‍याचा झाडा-जंगलातून जाणारा आवाज ऐकत थांबून राहायचे..

6

एखादीच नाव पाणी कापत संथपणे चाललेली…

7

8

अशा काही जागा असतात तिथे तुम्ही निशब्द होता.. लास व्हेगासला मानवाने निर्माण केलेले ते कर्तृत्व पाहून आपण अचंबित होतो.. तर इथे.. कोण निर्माता कोण जाणे.. त्या अनाम निर्मात्याची ही कलाकुसर.. निसर्ग!
आनंदाने वेड नाही लागलं तर तुम्ही एक नंबरचे अरसिक! Smile

9

10

5

( तटी: यातले काही फोटोज मागच्या वर्षी मी ब्लॉगवर टाकले आहेत. लेख लिहायचा म्हणून
ते व नवीन काही फोटोज इथे डकवले आहेत.. )

अजुन एक माहीती विकीवर मिळाली ती अशी की, इथे पुर्व-पश्चिम अशा पर्वतरांगा असल्याने सूर्योदयाच्यावेळी जगात काहीच गावांमधे दिसणारी “पिंक मोमेंट” दिसते.. विकीमधे म्हणतात..

“The fading sunlight creates a brilliant shade of pink on the Topatopa Bluffs that stand at the east end of the Ojai Valley, reaching over 6,000 feet (1,800 m) above sea level. Nordhoff Ridge, the western extension of the Topatopa Mountains, towers over the north side of the town and valley at more than 5,000 feet (1,500 m). Sulphur Mountain creates the southern ranges bounding the Ojai Valley, a little under 3,000 feet (910 m) in elevation.”

( फोटो आंतरजालावरून साभार.. http://www.flickr.com/photos/gamma-infinity/540215547/)

शिवाय एक इंटरेस्टींग माहीती ओहायच्या संदर्भात.. लॅरी हॅगमॅन(आय ड्रीम ऑफ जिनी मधला नेल्सन) , जॉनी डेप आणि जे. कृष्णमूर्ती ( फिलॉसॉफर ) हे ओहायचे रहिवासी आहेत/होते.. विशेषत: जे कृष्णमूर्तींचे बरेच वास्तव्य इथे होते, आणि त्यांनी इथे बरेच काम केले आहे… Smile

Signature2

Popularity: 6% [?]

Tags:

· · · ◊ ◊ ◊ · · ·

या ब्लॉगवरची पोस्ट्स थेट तुमच्या इमेल-बॉक्स मध्ये वाचण्यासाठी तुमचा इमेलऍड्रेस येथे भरा, इमेलमधून पक्का होकार भरा :) आणि झालं काम! इथून पुढच्या नवीन पोस्टस तुमच्या इमेल मध्ये!

Delivered by FeedBurner

Subscribe to माझे विचार... by Email
Friend Connect
visitors..
Visit blogadda.com to discover Indian blogs IndiBlogger - The Indian Blogger Community blogarama.com
Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes